झुमका गिरा रे बरेली के बाजार में..
*‘मेरा साया’* हा सिनेमा १९६६ चा. *'झुमका गिरा रे बरेली के बाजार में...!’* हे या सिनेमातील अतिशय गाजलेले गाणे. या गाण्यात *बरेलीच्या बाजारात नायिकेचा झुमका हरवलाय. पण ५४ वर्षांनी तो सापडला आहे.* आता तो पहायला बरेलीलाच जावे लागेल.
*बरेली हे उत्तरप्रदेशातील एक शहर.* ५४ वर्षापूर्वी केवळ या गाण्यामुळे संपूर्ण भारतात प्रसिद्धिस आले.
त्याबद्दल *बरेली विकास प्राधिकरणाने शहरातील एन एच २४ वर झीरो पॉइंट येथे एक झुमका उभा केलेला आहे. त्याची ऊंची १४ फूट व वजन आहे २०० किलोग्रॅम. पितळ व तांब्याचा हा झुमका बनवला आहे गुडगावच्या एका कारागिराने. त्याची किंमत आहे १८ लाख रुपये.*
या ठिकाणांचे नाव आहे *“झुमका तिराहा.”* ५४ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये झुमक्याचे हे स्मारक उभे राहिले आणि आता पर्यटकांचे आकर्षण स्थळ झाले आहे.
या गाण्याचे गीतकार आहेत *राजा मेहंदी अली खान.* गायिका *आशा*, संगीतकार – *मदन मोहन.* पडद्यावर गीत सादर केलय बहारदार नृत्य करून *दिवंगत साधनाने.*
‘मेरा साया’ (१९६६) हा सिनेमा मराठी ‘पाठलाग’ (१९६४) या सिनेमावरुन काढणेत आला. मूळ सिनेमाच्या कथेशी गाण्यातील बरेली या शहराचा दुरान्वयेही संबंध नाही.
*पण बरेली गावात झुमका पडल्याची कहाणी मात्र अगदी खरी आहे.*
आणि त्या कहाणीचा संबंध आहे *अभिताभ बच्चन परिवाराशी.*
अभिताभ यांचे पिताश्री हरिवंशराय बच्चन व मातोश्री तेजी ( माहेरचे आडनाव- सूरी) यांची पहिली भेट बरेलीला एका नातेवाईकाच्या लग्नात झाली. त्यावेळी झालेल्या एका घरगुती कार्यक्रमात हरिवंशराय यांना एखादी कविता म्हणण्याचा आग्रह झाला. त्यांनी कविता अतिशय सुंदररित्या सादर केली. ती ऐकून तेजी यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. हरिवंशराय यांचे डोळे तेजी यांची ही अवस्था पाहून भरून आले. या पहिल्या *कविताभेटीचे* रूपांतर नंतर एका *प्रेमकथेत* झाले. पण त्यांच्या लग्नाची बातमी येत नसल्याने सारे मित्र नेहमी चौकशी करीत. गीतकार राजा मेहंदी दोघांचेही चांगले मित्र होते. त्यांनी पण एकदा तेजी यांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्या म्हणाल्या, “मेरा झुमका तो बरेली के बाजार में गिर गया है..!” लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तेजी यांनी केलेले हे विधान राजा मेहंदी यांच्या अगदी डोक्यात बसले होते.
जेव्हा मेरा साया चित्रपटाची गाणी लिहायची वेळ आली तेव्हा त्यांना तेजी यांच्या या वाक्याची आठवण झाली. त्या वाक्यावर त्यांनी हे गाणे पूर्ण लिहिले. आणि या गाण्याने बरेली शहराला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्याचे उतराई होण्यासाठी बरेली गावात ५४ वर्षांनी(२०२०) हा हरवलेला झुमका उभा राहिलाय.
सिनेमाची कथा वेगळीच आहे. या गाण्याचा व त्या बरेली गावाचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. बरेलीमध्ये पहिली भेट झाली अभिताभ यांच्या मात्या -पित्याची. त्यांचाही या सिनेमाशी काहीएक संबंध नाही.
*कशाचाही कशाशीही संबंध नसताना आज एका सिनेगीताचे-कलाकृतीचे असे अविस्मरणीय स्मारक उभे राहते ही आश्चर्यकारक घटना आपल्या बॉलीवुड मध्येच घडू शकते.*
*त्यावेळचे हे प्रतिभावान कलाकार त्यांच्या स्पर्शाने कोणत्याही घटनेला व त्यावर आधारीत कलाकृतीला अजरामर करून टाकत असत. अशा अनेक उदाहरणापैकी हे एक...!🙏*
*- गौरी साने*
Comments
Post a Comment